घरातला पाळीव कुत्रा आज शहरी भागात घरातील एक सदस्यच बनला आहे. मात्र रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या नशिबी सतत हाडहाडच असते. आता तर लॉकडाउनमुळे त्यांना कुणी खायलाही टाकत नाही. मात्र मोकाट कुत्र्यांविषयी कणव असणारी अमृता लॉकडाउन सुरू झाल्यापासून त्यांना दररोज सकाळचे जेवण देत आहे. तिच्या या कामात ‘काय हा वेडेपणा’ असं म्हणणाऱ्यांपैकी नसलेले आई-वडीलही साथ देत आहेत.
कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाला आणि रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना कुणी हॉटेलवाले, कोणत्या घरापुढे मिळणारा भाकरीचा, ब्रेडचा तुकडादेखील मिळणे दुर्लभ झाले. अशा परिस्थितीत प्राणिमात्रांविषयी आपुलकी, प्रेम वाटणाऱ्या ‘पीपल्स फॉर ॲनिमल्स’ संस्थेचे स्थानिक पदाधिकारी, सदस्य पुढे सरसावले आहेत. अशाच स्वखर्चातून या मुक्या जिवांना दररोज सकाळी डॉग फूड देण्याचे काम करत आहेत अमृता दौलताबादकर. त्या पीपल्स फॉर ॲनिमल्सच्या इथल्या शाखेच्या सचिव आहेत.
सकाळी पावणेसात वाजता त्या वडील सतीश दौलताबादकर यांच्यासोबत भात, डॉग फूड घेऊन कारने निघतात. घराच्या परिसरातील कुत्रे त्यांची चाहूल लागताच घराजवळ गर्दी करतात. त्यांना भात आणि डॉग फूड दिल्यानंतर पुढे औरंगपुरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट परिसर या ठिकाणी कुत्र्यांना अन्न देतात. सध्या लॉकडाउन असल्याने विद्यापीठात चारचाकी नेता येत नसल्याने त्यांची आई निशा तोपर्यंत तिथे दुचाकी घेऊन येऊन थांबतात. त्यानंतर अमृता दौलताबादकर कुत्र्यांसाठी अन्न घेऊन दुचाकीवर विद्यापीठात फिरून मोकाट कुत्र्यांना खायला देतात. पावणेनऊपर्यंत ५० ते ६० कुत्र्यांना खायला देऊन त्या परत घरी येतात.
आजोबा आधी कुत्र्याला खाऊ घालायचे, मग जेवण करायचे. वडीलही गोशाळांना सतत दानधर्म करतात. यामुळे साहजिकच प्राण्यांविषयी माझीही आवड वाढत गेली. कुत्र्यापासून कोरोना होतो हा खूप मोठा गैरसमज आहे. मला जेवढे शक्य आहे तेवढे करते; मात्र यासाठी इतरांनीही पुढे आले पाहिजे. कुत्र्यांना दोन-तीनवेळा भाकरी दिली तर तो देणाऱ्यावर कधी भुंकणार नाही. आपुलकी, प्रेम हे वाढत जाते. कुत्र्याच्या प्रामाणिकपणाचे ऐतिहासिक, पौराणिक दाखले दिले गेले आहेत.
- अमृता दौलताबादकर, श्वानप्रेमी

भारी मधुभाऊ
ReplyDelete