Friday, May 1, 2020

पंचविशीतला पिंपळ


                   

चैत्र संपला अन वैशाखाची सुरूवात झाली. वैशाख (मे ) चा पहिलाच दिवस. उन सकाळपासूनच तापायला लागलं होतं. नदीकडच्या अंगानं असलेल्या तुकाराम बाबाच्या घरात लगबग सुरू होती. दोघा नवरा बायकोची एकच धांदल उडाली होती. करती सवरती मोठी पोरं आपापल्या गावातच नोकरीच्या निमतानं अडकून पडल्याली, आमी डायरेक्ट तिकडंच येतो असा त्यांचा निरोप आल्यानं, या दोघाच शरीरानं थकलेल्या दोन जीवांची तारांबळ उडाली होती. मदतीला होती त्यांची गावातच सासर असलेली मुलगी. ती अन तिची मुलंबी मामाचं लगीन म्हणून अंग मोडून कामाला लागली होती. आज एक तारीख, आज सांच्यालाच निघावं लागंल म्हणून टेम्पो मिळवायला बाबाच्या नातवांची शोधाशोध सुरू होती. शेवटी गावातल्या जंगमाचा एकदाचा टेम्पो फायनल झाला, तसं सगळ्याचा जीव भांड्यात पडला. दिवस मावळेपर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी राहणारी बाबाची मोठी मुलगीबी नातवंडांना संगं घेऊन माहेरात लहान भावाच्या लग्नासाठी आली होती. पाव्हणेरावळे जमत होते अन संध्याकाळ होईपर्यंत तुकारामबाबाचं घर गच्च भरलं. मावळतीकडं महादेवाच्या देवळाआड सुर्य लपला तसं बाबाच्या घरी आवरा आवर वाढली. साऱ्या महिल्यात फिरून एक जण चला , आवरा टेम्पो येऊन थांबलाय असा घरोघरी निरोप देत फिरत होता. बघता बघता चिल्यापिल्या घेऊन, कुणी सडेच तर काही वयोवृद्ध टेम्पोत बसले. नवरदेव म्हणुन मधूला टेम्पोत ड्रायव्हर जवळ बसायचा मान मिळाल. तुकारामबाबा अन धोंडामायला किती आनंद झाला होता म्हणावं विचारता सोय नाही. तुकारामबाबा शहरात शिकायला असलेल्या आपल्या पोराला सारखं म्हणायचा लगीन कर बाबा, मात्र पोराचं नेहमी ठरलेलं उत्तर आसायचं आत्ताच नाही. मायबाबाला सारखं काळजी वाटायची पोरगं लगीन का करत नाही. गावातल्या बरोबरच्या पोरायची लग्नं झाली अन हे का बरं नाही म्हणतंय. आमचे डोळे मिटायच्या आधी ह्याच्या डोसक्यावर आक्षिदा पडल्या म्हणजी आमाल समाधान वाटंल असं त्यांना राहून राहून वाटायचं अन आज तो दिवस उजडला होता म्हणुन ते दोघं खुशीत होते. रात्रीचे आठ नवू वाजता वराडानं तुडूंब भरलेला टेम्पो रात्रीचा काळोख मागं टाकत औरंगाबादकडं निघाला.

टेम्पोत आधी दाटीवाटीनं बसलेले, कुणी एका पायावर भार देऊन अवघडलेल्या अवस्थेत बसलेल्यांनी नकर नकर चोपा की तिकडं म्हणत,  सरकवा सरकी करत जागा करून घेतली. हळू हळू वरहाडी पेंगायला लागले. मांजरसुंब्याच्या घाटात टेम्पो वळणं घेत असताना काहीजणांना जाग आली. मागच्या अंगाला बसलेले अंधारात डोळे फाडू फाडू उंच घाट , खोल दरीकडं पाहत कुणीतरी म्हणायचं मायला वरहो किती उच डोंगर हाय,  तर दुसरा त्याच्या सुरात सुर मिसळत दरी किती खोल असंल ? असा उत्तर न मिळणारा प्रश्न करायचा. त्यांच्या बडबडीनं झोपमोड झालेली एखादी बाई त्यांच्यावर खेकसायची. तर ड्रायव्हर जवळ कधी एकदा औरंगाबादला पोहचू असं झालेल्या नवरदेवाचं सतत मागं जाणाऱ्या किलोमीटरच्या दगडाकडं लक्ष होतं. अखेर एकदाचं चिकलठाणा आलं तोवर तांबडं फुटाया लागलं होतं, एखादं दुसरं वाहन रस्त्यावरून दिसत होतं. औरंगाबाद आलं अशी टेम्पोत कुजबूज सुरू झाली, एकेक डोळे चोळत उठून रस्त्यावरचे दिवे, मोठाल्या बिल्डिंग, मोठाले डांबरी रस्ते बघून त्यांचं आवाक होऊन वर्णन करत होते. बघता बघता टेम्पो लग्नाच्या ठिकाणी पोहचला. वराडी मंडळी पटापटा उड्या मारत खाली उतरले. अंगाला आळखोपिळोखे देत कुणी पाय मोकळे करू लागले तर कुणी तंबाखूची चिमुट भरली. कुणी बिडी पेटवली. अंधार हाय तवर व्हा मोकळं म्हणत काही जणांनी आडोसा जवळ केला.


लग्नघटीका समीप येत होती, पण मंडप टाकणाऱ्यानं ऐनवेळी दगा दिल्यानं वधूपिता लक्ष्मण अण्णाची तारांबळ उडाली होती. ऐनवेळी कशीबशी व्यवस्था झाली, हीच अवस्था स्वयंपाक करणाऱ्यांनी वधूपक्षाकडील लोकांची केली होती. घरातली मोठी मुलगी अन् घरातलं पहिलंच कर्तव्य असल्यानं बिचाऱ्या वधूपित्याची खूपच धांदल उडाली होती . मात्र नंतर सारं व्यवस्थित पार पडत गेलं. लग्न स्थळी वधूच्या पेहरावात आलेल्या जयाकडं बघून खेड्यातल्या बाया तिचं तोंडभरून कौतुक करत होत्या. कायबी मना मधूहून चांगली सून मिळाली बगा, असं बाया माणसांचे शब्द कानावर पडताच तुकारामबाबा, धोंडामायला अंगावर मुठभर मास चढल्यासारखं झालं होतं. तर तिकडं वधूच्या मैत्रिणी तीला डिवचत होत्या काय बाई किती किडमिडीत आहे नवरदेव आणि किती खेडवळ. त्यावर जयाचं उत्तर होतं आई वडीलांची जी पसंत तीच माझी. शहरात राहूनही आपल्यावरचे संस्कार किती जपले आहेत हिनं असं मैत्रीणी म्हणायच्या.
लग्नाची वेळ अकरा वाजेची पण उशीर होता होता दुपारचा एक - दीड वाजला. ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेनं वाट पहात होते, तो क्षण आला आणि सर्वांच्या साक्षीनं मधू - जया हे दोन जीव मनानं एकमेकांचे झाले, जन्मोजन्मीच्या प्रेमबंधनाच्या गाठीत बांधले गेले. उपस्थितांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत संसारात सदा सुखी समाधानी राहण्याचा आशिर्वाद दिला. फटाक्याची आतषबाजी,  मंगलवाद्यांचा गजर सुरू झाला. तिकडं तिच्या आई - अण्णाचे डोळे नकळत पाणावले. लहाणपणापासून जपलेली, लाडानं वाढवलेली पोर आता परकी झाली म्हणत ती दोघंही गहीवरले. काळजी करू नका, आता तिची काळजी घ्यायला हामी हावकी म्हणत धोंडामाय त्यांना दिलासा देत होती. कितीही अडचणी आल्या तर कधी धीर न सोडणारा लक्ष्मणअण्णा अन् त्यांची बायको भिवराबाई मुलगी सासरी निघाली तसं त्यांच्यातली विरहभावना असह्य झाली. मुलीची पाठवण करून घरी उदासवाणे अंगणात बसले. कुठपर्यंत गेली असेल आपली लेक हा विचार मनात सुरू असलेल्या भिवराबाईची नजर घराच्या एका कोपऱ्यात आलेल्या पिंपळाच्या ईवल्याशा रोपट्यावर पडली. मुलीचा विरह कमी व्हावा म्हणून त्या जागच्या उठल्या. अलगदपणानं ते ईवलसं रोपटं तिथुन काढलं आणि अंगणाच्या अगदी समोर चांगलं लाऊन त्याला पाणी टाकलं. मुलीचंही आयुष्य असंच. एका ठिकाणी उगवायचं आणि दुसरीकडं नव्या जागेत रूजायचं, वाढायचं ज्या घरी जाऊ तिथं सासरी सगळ्या कुटूंबाला मायेची सावली द्यायची. माहेर , सासरचा उद्धार करायचा अशीच आहे जया.
2 मे 2020 रोजी आईनं लावलेला पिंपळ आता खूप मोठा झालाय, फांद्या, हिरव्यागार  पानांनी बहरलाय आणि यावर आता रोज पक्षांचे मंजूळ स्वर कानात रूंजी घालतात.

Sunday, April 26, 2020

प्रतिकुल वातावरणातही बहरण्याची प्रेरणा देणारा बहावा



उन्हाळ्यात सर्वत्र रखरखीत उन, डोळ्यासमोर झुळझुळणाऱ्या उन्हाच्या झळा यामुळं उन असह्य होतं. मात्र याच रखरखीत उन्हात मनाला आणि डोळ्यांना आनंद देतो तो पिवळा धमक बहावा. याला अमलताश या नावानं देखील ओळखले जाते. प्रतिकुल वातावरण असतानाही बहरणं शिकावं ते बहाव्याच्या झाडाकडून. 



डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवडा विद्यापीठाच्या परिसरात रस्त्यांनं जाताना अधून मधून या आकर्षक अमलताश फुलांच्या जोडीनं विविध रंगी फुलंही उन्हाळ्यात पहायला मिळतात.



 साधारणत: एप्रिल - मे दरम्यान अमलताश पिवळ्या धमक फुलांनी पुष्पप्रेमींना भुरळ घालतो. यात  औषधी  गुणधर्म  असतात . 

रस्त्यावर उपाशी फिरणाऱ्या कुत्र्यांना मिळतेय पोटभर जेवण


 घरातला पाळीव कुत्रा आज शहरी भागात घरातील एक सदस्यच बनला आहे. मात्र रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या नशिबी सतत हाडहाडच असते. आता तर लॉकडाउनमुळे त्यांना कुणी खायलाही टाकत नाही. मात्र मोकाट कुत्र्यांविषयी कणव असणारी अमृता लॉकडाउन सुरू झाल्यापासून त्यांना दररोज सकाळचे जेवण देत आहे. तिच्या या कामात ‘काय हा वेडेपणा’ असं म्हणणाऱ्यांपैकी नसलेले आई-वडीलही साथ देत आहेत.

कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाला आणि रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना कुणी हॉटेलवाले, कोणत्या घरापुढे मिळणारा भाकरीचा, ब्रेडचा तुकडादेखील मिळणे दुर्लभ झाले. अशा परिस्थितीत प्राणिमात्रांविषयी आपुलकी, प्रेम वाटणाऱ्या ‘पीपल्स फॉर ॲनिमल्स’ संस्थेचे स्थानिक पदाधिकारी, सदस्य पुढे सरसावले आहेत. अशाच स्वखर्चातून या मुक्या जिवांना दररोज सकाळी डॉग फूड देण्याचे काम करत आहेत अमृता दौलताबादकर. त्या पीपल्स फॉर ॲनिमल्सच्या इथल्या शाखेच्या सचिव आहेत.


सकाळी पावणेसात वाजता त्या वडील सतीश दौलताबादकर यांच्यासोबत भात, डॉग फूड घेऊन कारने निघतात. घराच्या परिसरातील कुत्रे त्यांची चाहूल लागताच घराजवळ गर्दी करतात. त्यांना भात आणि डॉग फूड दिल्यानंतर पुढे औरंगपुरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट परिसर या ठिकाणी कुत्र्यांना अन्न देतात. सध्या लॉकडाउन असल्याने विद्यापीठात चारचाकी नेता येत नसल्याने त्यांची आई निशा तोपर्यंत तिथे दुचाकी घेऊन येऊन थांबतात. त्यानंतर अमृता दौलताबादकर कुत्र्यांसाठी अन्न घेऊन दुचाकीवर विद्यापीठात फिरून मोकाट कुत्र्यांना खायला देतात. पावणेनऊपर्यंत ५० ते ६० कुत्र्यांना खायला देऊन त्या परत घरी येतात.

आजोबा आधी कुत्र्याला खाऊ घालायचे, मग जेवण करायचे. वडीलही गोशाळांना सतत दानधर्म करतात. यामुळे साहजिकच प्राण्यांविषयी माझीही आवड वाढत गेली. कुत्र्यापासून कोरोना होतो हा खूप मोठा गैरसमज आहे. मला जेवढे शक्य आहे तेवढे करते; मात्र यासाठी इतरांनीही पुढे आले पाहिजे. कुत्र्यांना दोन-तीनवेळा भाकरी दिली तर तो देणाऱ्यावर कधी भुंकणार नाही. आपुलकी, प्रेम हे वाढत जाते. कुत्र्याच्या प्रामाणिकपणाचे ऐतिहासिक, पौराणिक दाखले दिले गेले आहेत.
- अमृता दौलताबादकर, श्‍वानप्रेमी